राज्याचे गृहनिर्माण मंत्री 
ना. डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब 
यांच्या मार्गदर्शनाखाली या मंडळाची 
अखंड जनसेवेची वारी सुरुच आहे आणि 
ती कायम सुरु राहणार आहे! 

हात उगारण्यासाठी नव्हे तर उभारण्यासाठी असतात, हे तत्व जो समाज अंगीकारतो, त्याच समाजाला आपल्या विभागाचा... आपल्या गावाचा... आपल्या शहराचा.. आपल्या जिल्ह्याचा अन् आपल्या देशाचाही विकास साधता येतो. कारण, देश म्हणजे काय तर केवळ नकाशाच्या आखलेल्या रेषा नव्हे तर देश म्हणजे माणसांच्या जीवंतपणाचे लक्षण; देश म्हणजे साामाजिक सौहार्दाचे वचन अन् देश म्हणजे जित्या-जागत्या माणुसकीचे दर्शन! हीच धारणा ठेवून पाचपाखाडीसारख्या कधीकाळी शहरावरुन ओवाळून टाकलेल्या अन् अत्यंत मागास असलेल्या विभागात 1979 मध्ये काही तरुण एकत्र आले. नरवीर तानाजी मालुसरेंनी आपले हात केवळ वैर्‍याला मारण्यासाठी नव्हे तर स्वराज्य उभारण्यासाठी उगारले होते; याची जाणीव असलेल्या या तरुणांनी त्यांच्याच नावाने एकत्र येण्याचा चंग बांधला अन् त्यातून साकारले नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ!

विघ्नहर्ता, श्रीगणेश, गणपती, गणराय अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणार्‍या आपल्या आराध्यासाठी तरुण एकत्र येऊ शकतात, याची जाणीव असलेल्या पाचपाखाडी भागातील तरुणांनी एकत्र येत सार्वजनिक गणेशोत्सवाचे एक छोटेसे रोपटे लावले. आज या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. सन 1979 पासून म्हणजेच गेली 43 वर्षे या रोपट्याची जपणूक केली जात आहे. या मागे फक्त आणि फक्त विधायक भावनाच आहे. ज्यावेळी माहिती तंत्रज्ञानाचे युग नव्हते; त्याकाळी या तरुणांनी नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या नावाने तरुणांचे हात विधायक कामाला लावले. सामाजिक जनजागृती आणि त्यातून तरुणांना वाममार्गापासून रोखण्याचा त्यावेळच्या तरुणांचा हा उद्देश आज सफल होताना दिसत आहे. 

पाचपाखाडी हा विभाग जरी ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असला तरी अपेक्षित विकास झाला नव्हता. या भागाला ओळखच निर्माण करुन दिली ती नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने... अनेकांना ही अतिशयोक्ती वाटेलही; कदाचित अनेकांना ही आत्मस्तुतीही वाटेल! पण, गतकाळाच्या गर्भात जर डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याची प्रचिती सर्वांनाच येईल. काय ओळख होती पाचपाखाडीची? काही आठवतंय का कोणाला? या भागात कधीकाळी हाणामार्यांची नांदीच होती. अनेक तरुण समाजकंटकांच्या आहारी जात होते. अशावेळी वाढणार्या मुंबईतून ठाण्यात स्थलांतरीत झालेल्या तरुणांनी पाचपाखाडी बदनाम होऊ नये, या उद्देशाने नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. 

सध्या गणेशोत्सव साजरा करणार्या मंडळांची संख्या मोठी आहे. किंबहुना, ती वाढलीदेखील पाहिजे. कारण, गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव आहे असे नाही तर गणेशोत्सव हे प्रबोधनाचे, गणेशोत्सव हे एकतेचे, गणेशोत्सव हे सर्वधर्मसमभावाचे प्रतिक आहे. या उत्सवात सहभागी होणारा प्रत्येकजण प्रबोधन, एकात्मताच जोपासत आला आहे. अन् याच भावनेतून नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उत्साही कार्यकर्ते हे हितचिंतक-स्नेही यांच्या पाठबळावर प्रबोधनाचा वेलू गगनावर नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या 43 वर्षांत नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने असंख्य पुरस्कार प्राप्त करुन प्रबोधनात्मक सजावटींची परंपरा कायम राखली आहे.

 विशेष म्हणजे, मराठी माणूस हा जरी उत्कृष्ठ पर्यटक असला तरी त्याला देशभरातील मंदिरांची वारी करणे आर्थिकदृष्ट्या अन् सांसारिक अडचणींचा डोंगर पार करुन पूर्ण करणे शक्य होत नसते. याची जाणीव असलेल्या आमच्या मंडळाने जागतिक दर्जाचे कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या माध्यमातून देशभरातील अनेक मंदिरशिल्पे साकारुन ठाणेकरांना भारतातील मंदिरांचे दर्शन पाचपाखाडीमध्येच घडविले आहे. सन 1979 पासून आजतागायत शहीद स्मारक, राजवाडा, महाराष्ट्राचे संस्कृतीदर्शन, हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक असलेला काश्मिरमधील चरार-ए-शरीफ दर्गाह, स्वातंत्र्यानंतरचा भारत, स्वातंत्र्य लढ्यातील ठाणे शहर, मराठी माणसा जागा हो, भारतीय संस्कृतीचे दर्शन, युवाशक्ती, गणेश दरबार, मिनाक्षी मंदिर, गुंफा मंदिर, पार्वती महाल, राजस्थानी महाल, जोधा-अकबर महाल, सुवर्ण स्वर्ग अशा वैविध्यपूर्ण सजावटी साकारुन नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केवळ राज्यातच नव्हे तर देशात गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक परंपरा पोहचविली आहे. 

सामाजिक उतरदायित्वाची जाण असलेल्या आमच्या नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आजवर अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदविला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या मंडळाची अखंड जनसेवेची वारी सुरुच आहे आणि ती कायम सुरु राहणार आहे! 43 वर्षांपूर्वी म्हणजेच सन 1979 मध्ये सामाजिक भावनेतून जन्माला आलेल्या या मंडळाने केवळ सार्वजनिक गणेशोत्सवापुरते मर्यादीत न राहता आपत्ती निवारण असो अगर महामारी सर्वच आघाड्यांवर आपला लढा सुरु ठेवला आहे. 43 वर्षांपूर्वीचे ते तरुण आता उतारवयात आले आहेत. ज्येष्ठांनी दिलेला वारसा असाच जोपासत ठेवण्याची जबाबदारी पुढच्या पिढीकडे आली आहे. ही जबाबदारी त्याच ताकदीने जोपासण्याचा आमचा प्रयत्न सुरुच राहणार आहे; किंबहुना, हा वारसा आमच्या पुढील पिढीकडेही सुपूर्द करण्याची तयारी आम्ही आताच सुरु केली आहे.

भावी काळात नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून सामाजिक समता, एकात्मता आणि देशसेवा अशीच घडत राहो; मंडळाच्या माध्यमातून एकसंघ समाजाची उभारणी होवो, उगारणारे नव्हे तर उभारणारे हात निर्माण करण्याचे बळ आमच्या मनगटात येवो, हीच विघ्नहर्त्यापुढे प्रार्थना!

CONTACT

नरवीर तानाजी ​सार्वजनिक ​गणेशो​त्सव मंडळ

पांचपाखाडी, ठाणे (पश्चिम) - ​४००६०२
        - ​०२२ २५३४ ८२८२, २५३४ ६९६९     

- ​+९१ ८१०८६ ९११११